जरांगेंच्या मनधरणीसाठी सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीत, जरांगेंच्या उपोषणाच्या इशार्‍यानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये....

Foto
मुंबई: राज्यातील सर्व मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे यासाठी आतापर्यंत अनेक वेळा आमरण उपोषण करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उद्यापासून (३० मे) मराठवाड्यातल्या रणरणत्या उन्हात पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार मधील नेत्यांची धाबे दणाणले आहेत   तर दुसरीकडे ओबीसींनीही  राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारपासून अंतरवाली सराटीत उपोषणाचा दिलेल्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता सरकारच्या वतीने उद्या शिष्टमंडळ त्यांच्या गावात जाणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना शिंदे पक्षात नव्याने प्रवेश केलेले आमदार बच्चू कडू आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड जरांगे पाटील यांची त्यांच्या गावात भेट घेऊन समजूत काढणार आहेत.

जरांगे यांच्या सात प्रमुख मागण्या आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण द्यावे, सगे सोयरे आदेशाची पूर्ण अंमलबजावणी, जुन्या नोंदी लागू करणे, मराठा आंदोलनकांवरील गुन्हे मागे घेणे, आंदोलनातील मृतांना जखमींना आर्थिक मदत, कुणबी प्रमाणपत्राची माहिती, आणि सरकारने आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांचे शासन आदेश या मागण्यांचा समावेश आहे. त्यासाठी त्यांच्या मूळगावी अंतरावाली सराटीत अन्न, पाण्याचा त्याग करुन रणरणत्या उन्हात आमरण उपोषण करणार आहेत. महागाईचा भडका, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, कांद्यांचा प्रश्न, शेतकरी कर्जमाफी अशा अनेक प्रश्नांनी केंद्र व राज्य सरकार घेरले गेले असताना हा एक प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे महायुतीतील नेते जरांगे यांची समजूत काढण्यासाठी पाठविणार आहेत. 

उपोषणाची गरज पडणार नाही -विखे
कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जरांगेंचा गैरसमज दूर करू. कुणीतरी त्यांचा गैरसमज करून दिलेला आहे. मी त्यांच्यासमोर व्यवस्थित वस्तूस्थिती मांडणार असल्याने त्यांना उपोषणाची गरज पडणार नाही, असे मला विश्वास आहे, असे वखे पाटील म्हणाले. 

 ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर राज्यभर आंदोलन ः डॉ. तायवाडे
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून पुन्हा एकदा भर उन्हात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर राज्यभर ओबीसी समाज पेटून उठेल, असा स्पष्ट इशारा तायवाडे यांनी दिला आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील उद्यापासून आंदोलन करत आहेत, मात्र त्यांच्या मागण्या जुन्याच आहेत. जरांगे पाटील काहीही मागणी करतात, आमचा त्यांच्या मागण्यांना किंवा आंदोलनाला विरोध नाही. पण त्यांच्या मागण्या पूर्ण करताना मूळ ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये, अशी ठाम भूमिका तायवाडे यांनी मांडली.